Tuesday 15 November 2011

राजे कृष्णशहा

राजे कृष्णशहा
आज १६ नोव्हेंबर जव्हार संस्थानकरिता जनताभिमुख व विशाल शैक्षणिक दृष्टीकोन असणाऱ्या राजे कृष्णशहा उर्फ बाळासाहेब राजे मुकणे यांची पुण्यतिथी.
चौथे पतंगशहा यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे पुत्र श्रीमंत युवराज गणपतराव मल्हारराव मुकणे उपाख्य बाळासाहेबराजे अर्थात राजे कृष्णशहा यांनी दि. २७ जानेवारी १९०५ रोजी राज्याची सूत्रे हाती घेतली.मुंबईच्या एलफिस्टन हायस्कूल मध्ये शिक्षण झालेल्या ह्या राजाकडे विशाल  शैक्षणिक दृष्टीकोन होता. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. प्राथमिक शाळेत इंग्रजी शिक्षणाची सुरवात त्यांच्याच काळात झाली. आपल्या कारकिर्दीत आदिवासी समाजाची शैक्षणिक वृद्धी व्हावी म्हणून, आदिवासी मुला-मुलींसाठी वसतिगृह, बाहेर शिक्षणासाठी जाणाऱ्यासाठी विशेष सोयी सुविधा त्यांनी निर्माण केल्या होत्या. आजचे जव्हारचे के.व्ही.हायस्कूल याच राजे कृष्णशहा यांच्या नावाने चालविले जाते. जव्हारच्या जनतेला पत्रव्यवहाराची सोय व्हावी म्हणून त्यांनी पोस्ट ऑफिस उघडले. जव्हार साठी कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय, मलवाडा पर्यंत पक्का रस्ता, दळणवळणाच्या व शैक्षणिक सुविधा अश्या त्यांच्या जनताभिमुख सेवेमुळे इंग्रजांनी दिल्ली दरबारात सन्मानपूर्वक बोलावून  किरोनेशन मेडल देवून त्यांचा गौरव केला होता. दि.३ मार्च १९१४ रोजी हिंदी संस्थानिकांचे  अधिवेशन भरले होते त्याला हे राजे हजर होते. जनताभिमुख दृष्टीकोन मांडल्यामुळे त्यांची अधिवेशनातील उपस्थिती लक्षणीय होती.दि. १९ नोव्हेंबर १८७९ रोजी जन्मलेल्या आणि अवघे बारा वर्ष कारभार सांभाळणारा, तल्लख बुद्धी, प्रेमळ, रसिकता, आणि लोकाभिमुख असलेल्या  ह्या राजाचा ऐन तारुण्यात दि.१६ नोव्हेंबर १९१७ जी अकाली मृत्यू झाला.त्यानंतर त्यांचे दुसरे बंधू मार्तंडराव उर्फ भाऊसाहेब विक्रमशहाराजे यांनी राजगादी सांभाळली .

Monday 14 November 2011

जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत

जव्हार संस्थानचा सुर्यांकित भगवा ध्वज
श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज










 जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत
 
दिनांक १३ नोव्हेंबर १९४४ साली राजमान्यता मिळाले जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत,बडोद्याचे राजकवी ज्ञानरत्न यशवंत दिनकर पेंढारकर यांनी
जव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज हे दुसऱ्या महायुद्धवरून परत आल्यानंतर
त्यांच्या २७ व्या वाढदिवसा निमित्त जव्हार संस्थानचे स्वतंत्र राष्ट्रगीत म्हणून रचले.
    जव्हार  संस्थानची भौगोलिकता, वनवैभव, राजगुरू कृपाशीर्वाद,राजांची शौर्य गाथा,
मायभूमीवरील प्रेम, जनकल्याणकरी राजा अश्या रीतीने जव्हार संथांचा गौरव करणारे
हे राष्ट्रगीत आजपासून ६४ वर्षापूर्वी अर्थात दि.१३ नोव्हेंबर १९४४ साली
राजमान्यता मिळाल्यापासून ते जव्हार संस्थान विलीनीकरणापर्यंत
प्रत्येक समारंभात गायले जात असे.

जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत

जय मल्हार ! जय मल्हार !  गर्जु या जय मल्हार !!
सह्याद्रीचे हे पठार I
शौर्याचे हे शिवार I
राखाया या बडिवार I
येथे नवोनव अवतार II१II
येथले धनुष्यबाण I
अजून टणत्कार करून I
टाकतात परतून I
कळी काळाचे हि वर II२II
साग, शिसव, ऐन दाट I
सोन्याचे बन अफाट I
त्यांत शाह नांदतात I
दीनांचे पालनहार II३II
सदानंद -वरद- हात I
जयबांची शौर्य- ज्योत I
ध्वज भगवा सुर्यांकित I
दावी राज्य हे जव्हार II ४ IIप्यार अशी माय भूमी I
माय भूमी तव कामी I
वाहू सर्वस्व आम्ही I
होवू जीवावर उदार II ५ II
जय वंशी क्षेम असो
राजा विर्यो क्षेम असो I
जनता- कल्याण वसो I
त्यात सदा अपरंपार II ६ II

जुन्या राजवाड्याचे, जव्हार नगरपरिषदेकडे हस्तांतरण करार...


नगारखाना
श्रीगणपती मंदिरातील लाकडावरील सुंदर कोरीव काम
         ११ नोव्हेंबर १९७६ कार्तिक वद्य चतुर्थीचा तो ऐतिहासिक दिवस !  
त्या दिवशीचा सूर्यास्त जव्हारसाठी भाग्याचा ठरला.
जव्हारच्या इतिहासात एक आगळे वेगळे पान मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून लिहिले गेले. पश्चिमेला मावळणाऱ्या सूर्याच्या किरणांनी जव्हारच्या  राजवाड्याला एक नवी झळाळी प्राप्त करून दिली होती.
     जव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजेसाहेबांनी कृतज्ञतेच्या भावनेतून आपल्या ऐतिहासिक अश्या जुन्या राजवाड्याचे, जव्हार नगरपरिषदेकडे हस्तांतरण करारावर सही केली.जव्हार नगरपरिषदेच्या सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत जव्हारचे तत्कालीन नगराध्यक्ष रामचंद्र विष्णू तेंडूलकर, व जव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे या उभयतांमध्ये झालेला हा करार कृतज्ञतेच्या भावनेने ओथंबलेला असल्याने त्याला आगळे महत्व होते. जव्हारच्या जनतेने  राजघराण्यावर केलेल्या निस्सीम निष्ठेतून हा करार  संपन्न झाला होता.
    जव्हारचा पहिला राजवाडा हा खरा २६१ वर्षांपूर्वी हल्लीच्या जुना राजवाडा परिसरात सन १७५० साली कृष्णाशहा राजाने बांधला होता. दुदैवाने  अवघ्या ७२ वर्षांनी सन १८२० साली तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आज त्या जागी खुले नाट्यगृह आहे. त्यानंतर ७ वर्षांनी सन १८२७ मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या राजवाड्याचे बांधकाम, आपला मुलगा पतंगशहा याला राजगादीवर बसवून त्याच्या नावाने कारभार पाहणाऱ्या राणी सगुणाबाई यांनी सुरु केले.जव्हार परिसरातील कारागीर आणि जव्हार जवळील न्याहळे येथील कावळ्याचा बांध खाणीतील मजबूत व सुंदर दगडातून हा राजवाडा बांधण्यात आला.
    पुढे राजे कृष्णाशहा यांनी राजवाड्याचा विस्तार करून अतिभव्य असा दिमाखदार नगारखाना, गणपती सभागृह व अनेक खोल्या वाढवल्या.  ह्याच गणपती सभागृहातून जव्हारच्या सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तर चौथ्या पतंगशहांनी राजवाड्याच्या परिसरात एक गणपतीचे सुंदर मंदीर बांधले. राजदरबार, उद्याने, पाण्याचा तलाव, घोड्यांच्या पागा, विहीर, भव्य पटांगण, कडेकोट भिंती आणि चारी दिशांनी असणारे बुरुज असे वैभव ह्या राजवाड्याचे होते.
    सुमारे २१००० चौ.मी. क्षेत्र असलेला हा जुना राजवाडा आज जव्हार नगरपरिषदेच्या ताब्यात आहे. खुले नाट्यगृह,शिक्षण मंडळाचे कार्यालय, व्यायामशाळा, क्रीडांगण, गणपती सभागृह, पाण्याच्या उंच जलकुंभ, अश्या प्रकारच्या नागरी सुविधांसाठी ह्या राजवाड्याच्या इमारतींचा वापर केला जातो.
    म्हणूनच कृतज्ञता म्हणून ह्या दिवसाला जव्हारच्या इतिहासात एक आगळे महत्व आहे.