Monday 14 November 2011

जुन्या राजवाड्याचे, जव्हार नगरपरिषदेकडे हस्तांतरण करार...


नगारखाना
श्रीगणपती मंदिरातील लाकडावरील सुंदर कोरीव काम
         ११ नोव्हेंबर १९७६ कार्तिक वद्य चतुर्थीचा तो ऐतिहासिक दिवस !  
त्या दिवशीचा सूर्यास्त जव्हारसाठी भाग्याचा ठरला.
जव्हारच्या इतिहासात एक आगळे वेगळे पान मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून लिहिले गेले. पश्चिमेला मावळणाऱ्या सूर्याच्या किरणांनी जव्हारच्या  राजवाड्याला एक नवी झळाळी प्राप्त करून दिली होती.
     जव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजेसाहेबांनी कृतज्ञतेच्या भावनेतून आपल्या ऐतिहासिक अश्या जुन्या राजवाड्याचे, जव्हार नगरपरिषदेकडे हस्तांतरण करारावर सही केली.जव्हार नगरपरिषदेच्या सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत जव्हारचे तत्कालीन नगराध्यक्ष रामचंद्र विष्णू तेंडूलकर, व जव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे या उभयतांमध्ये झालेला हा करार कृतज्ञतेच्या भावनेने ओथंबलेला असल्याने त्याला आगळे महत्व होते. जव्हारच्या जनतेने  राजघराण्यावर केलेल्या निस्सीम निष्ठेतून हा करार  संपन्न झाला होता.
    जव्हारचा पहिला राजवाडा हा खरा २६१ वर्षांपूर्वी हल्लीच्या जुना राजवाडा परिसरात सन १७५० साली कृष्णाशहा राजाने बांधला होता. दुदैवाने  अवघ्या ७२ वर्षांनी सन १८२० साली तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आज त्या जागी खुले नाट्यगृह आहे. त्यानंतर ७ वर्षांनी सन १८२७ मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या राजवाड्याचे बांधकाम, आपला मुलगा पतंगशहा याला राजगादीवर बसवून त्याच्या नावाने कारभार पाहणाऱ्या राणी सगुणाबाई यांनी सुरु केले.जव्हार परिसरातील कारागीर आणि जव्हार जवळील न्याहळे येथील कावळ्याचा बांध खाणीतील मजबूत व सुंदर दगडातून हा राजवाडा बांधण्यात आला.
    पुढे राजे कृष्णाशहा यांनी राजवाड्याचा विस्तार करून अतिभव्य असा दिमाखदार नगारखाना, गणपती सभागृह व अनेक खोल्या वाढवल्या.  ह्याच गणपती सभागृहातून जव्हारच्या सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तर चौथ्या पतंगशहांनी राजवाड्याच्या परिसरात एक गणपतीचे सुंदर मंदीर बांधले. राजदरबार, उद्याने, पाण्याचा तलाव, घोड्यांच्या पागा, विहीर, भव्य पटांगण, कडेकोट भिंती आणि चारी दिशांनी असणारे बुरुज असे वैभव ह्या राजवाड्याचे होते.
    सुमारे २१००० चौ.मी. क्षेत्र असलेला हा जुना राजवाडा आज जव्हार नगरपरिषदेच्या ताब्यात आहे. खुले नाट्यगृह,शिक्षण मंडळाचे कार्यालय, व्यायामशाळा, क्रीडांगण, गणपती सभागृह, पाण्याच्या उंच जलकुंभ, अश्या प्रकारच्या नागरी सुविधांसाठी ह्या राजवाड्याच्या इमारतींचा वापर केला जातो.
    म्हणूनच कृतज्ञता म्हणून ह्या दिवसाला जव्हारच्या इतिहासात एक आगळे महत्व आहे.

2 comments:

  1. Great blog. Giving unknown info to world

    ReplyDelete
  2. Good information, not known to many from Jawhar/Outsider.


    dhananjay kulkarni

    ReplyDelete