Tuesday 15 November 2011

राजे कृष्णशहा

राजे कृष्णशहा
आज १६ नोव्हेंबर जव्हार संस्थानकरिता जनताभिमुख व विशाल शैक्षणिक दृष्टीकोन असणाऱ्या राजे कृष्णशहा उर्फ बाळासाहेब राजे मुकणे यांची पुण्यतिथी.
चौथे पतंगशहा यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे पुत्र श्रीमंत युवराज गणपतराव मल्हारराव मुकणे उपाख्य बाळासाहेबराजे अर्थात राजे कृष्णशहा यांनी दि. २७ जानेवारी १९०५ रोजी राज्याची सूत्रे हाती घेतली.मुंबईच्या एलफिस्टन हायस्कूल मध्ये शिक्षण झालेल्या ह्या राजाकडे विशाल  शैक्षणिक दृष्टीकोन होता. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. प्राथमिक शाळेत इंग्रजी शिक्षणाची सुरवात त्यांच्याच काळात झाली. आपल्या कारकिर्दीत आदिवासी समाजाची शैक्षणिक वृद्धी व्हावी म्हणून, आदिवासी मुला-मुलींसाठी वसतिगृह, बाहेर शिक्षणासाठी जाणाऱ्यासाठी विशेष सोयी सुविधा त्यांनी निर्माण केल्या होत्या. आजचे जव्हारचे के.व्ही.हायस्कूल याच राजे कृष्णशहा यांच्या नावाने चालविले जाते. जव्हारच्या जनतेला पत्रव्यवहाराची सोय व्हावी म्हणून त्यांनी पोस्ट ऑफिस उघडले. जव्हार साठी कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय, मलवाडा पर्यंत पक्का रस्ता, दळणवळणाच्या व शैक्षणिक सुविधा अश्या त्यांच्या जनताभिमुख सेवेमुळे इंग्रजांनी दिल्ली दरबारात सन्मानपूर्वक बोलावून  किरोनेशन मेडल देवून त्यांचा गौरव केला होता. दि.३ मार्च १९१४ रोजी हिंदी संस्थानिकांचे  अधिवेशन भरले होते त्याला हे राजे हजर होते. जनताभिमुख दृष्टीकोन मांडल्यामुळे त्यांची अधिवेशनातील उपस्थिती लक्षणीय होती.दि. १९ नोव्हेंबर १८७९ रोजी जन्मलेल्या आणि अवघे बारा वर्ष कारभार सांभाळणारा, तल्लख बुद्धी, प्रेमळ, रसिकता, आणि लोकाभिमुख असलेल्या  ह्या राजाचा ऐन तारुण्यात दि.१६ नोव्हेंबर १९१७ जी अकाली मृत्यू झाला.त्यानंतर त्यांचे दुसरे बंधू मार्तंडराव उर्फ भाऊसाहेब विक्रमशहाराजे यांनी राजगादी सांभाळली .

No comments:

Post a Comment